खासदार भाऊसाहेब वाकचौरे याच्या भूमिकेबाबत चर्चा
चर्चा।शिवाजी घाडगे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, खासदार वाकचौरे हे आगामी काळात वेगळी राजकीय भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा रंगत आहे. यापूर्वीही त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि तेथून उमेदवारी मिळविली होती. त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांना पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला.
दरम्यान, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अल्पावधीत खासदारकी मिळवली होती. त्यांनी सलग दोन वेळा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, नंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी शिंदे गटाची वाट धरली आणि त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
गत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदार वाकचौरे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा उमेदवारी दिली. राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाचा लाभ घेत त्यांनी विजय मिळविला आणि पुन्हा संसदेत पोहोचले.
तथापि, खासदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांवर अपेक्षित सक्रियता दाखविलेली नाही, अशी टीका विरोधकांसह काही शिवसैनिकांकडून केली जात आहे. अलीकडे शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या मेळाव्यास ते अनुपस्थित राहिल्याची चर्चा झाली होती. तसेच मुंबईतील काही पक्षीय बैठकींनाही त्यांनी उपस्थिती लावली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना अधिक बळ मिळत आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला भविष्यातील विधानसभा निवडणुकीत संधी मिळण्यासंदर्भात काही आश्वासने मिळाल्याने ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून दूर जाण्याचा विचार करीत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
सध्या या सर्व घडामोडी केवळ राजकीय चर्चांच्या स्वरूपात असून, खासदार भाऊसाहेब वाकचौरे किंवा संबंधित पक्षांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. त्यामुळे आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात, याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment