महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरुवात

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्रीला प्रारंभ
राहुरी : 
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात ‘फुले समर्थ’ या कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्री बुधवारपासून सुरू करण्यात आली. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते करजगाव (ता. नेवासा) येथील सुनिता फुलसौंदर आणि बेलापूर येथील शेतकरी मारुतराव राशिनकर यांना ‘फुले समर्थ’ कांदा बियाण्यांचे वितरण करून विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. महात्मा फुले विद्यापीठाचे संशोधन केलेले बियाणे खरेदी साठी महाराष्ट्रातून शेतकरी येत असतात 
 यावेळी कुलगुरू डॉ. खर्चे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत ‘फुले समर्थ’ या वाणाची वैशिष्ट्ये सांगितली. आकर्षक लाल रंग, चांगली गुणवत्ता आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे या वाणाला इतर कांदा वाणांच्या तुलनेत अधिक बाजारभाव मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या कांदा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करताना त्यांनी सुपीक, मध्यम ते भारी जमिनीची निवड करण्याचा सल्ला दिला. पेरणीपूर्वी बियाण्यांवर कार्बेन्डाझीम (बाविस्टीन) २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी, तसेच खरीप कांद्याची पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात आणि रांगडा कांद्याची पेरणी जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी, असे त्यांनी सांगितले.
कांदा लागवडीसंदर्भातील विद्यापीठाने शिफारस केलेले तंत्रज्ञान बियाण्यांच्या पिशवीवर क्यूआर कोडच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कांदा बियाणे विक्री अधिक सुलभ करण्यासाठी यावर्षी नाशिक जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, निफाड; कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत; कृषी महाविद्यालय, मालेगाव; पुणे; हाळगाव; कृषी विज्ञान केंद्र, धुळे तसेच कृषी संशोधन केंद्र, चास येथे ‘फुले समर्थ’ वाणाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विक्रीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी डॉ. डी. बी. क्षीरसागर, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, बियाणे विभागाचे बीजोत्पादन अधिकारी डॉ. कैलास भोईटे, प्रक्षेत्र अधीक्षक प्रा. बी. टी. शेटे, सहाय्यक बीजोत्पादन अधिकारी डॉ. कैलास गागरे, तांत्रिक अधिकारी डॉ. राजेंद्र माने, सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे तसेच बियाणे विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र काशिद यांनी सांगितले की, यंदा बियाणे विक्री प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था करण्यात आली असून शेतकरी बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह दर्शक फलक आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कांदा बियाण्याचा उपलब्ध साठा संपेपर्यंत विक्री सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार