जिल्हा ग्रंथालय अधधिकारी अशोक गाडेकर यांची नवी मुंबईला बदली
वाचन संस्कृतीच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण योगदान; डिजिटल ग्रंथालय, आधुनिक सुविधा विकासकामांची ठळक छाप निर्माण करणारे अशोक गाडेकर यांची नवी मुंबईला बदली
घाडगे न्यूज। प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला आधुनिकतेची जोड देत वाचन संस्कृतीला नवी उभारी देणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांची लोकहित व प्रशासकीय कारणास्तव सहायक ग्रंथालय संचालक, कोकण भवन, नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्यातील ग्रंथालय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याचा ठसा दीर्घकाळ कायम राहील, अशी भावना ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथपाल आणि वाचनप्रेमींनी व्यक्त केली आहे.
सन २०१९ मध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारल्यानंतर गाडेकर यांनी ग्रंथालय व्यवस्थापनात केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे, तर ग्रंथालय चळवळीचे अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून काम केले. नाशिक येथील सार्वजनिक ग्रंथालयातून सेवेला सुरुवात केल्याने कर्मचारी, ग्रंथपाल आणि संस्थांच्या अडचणी त्यांना जवळून माहिती होत्या. त्यामुळे त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि समन्वय यांचा योग्य मेळ घालत प्रशासनाला विकासाभिमुख दिशा दिली.
कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण यंत्रणा ठप्प असतानाही त्यांनी सुमारे २५ हजार ग्रंथांची ऑनलाइन डेटा एन्ट्री पूर्ण करून ग्रंथालयांचे डिजिटायझेशन वेगाने पूर्ण केले. त्यानंतर ई-ग्रंथालय आज्ञावली प्रणालीद्वारे वाचकांना घरबसल्या ग्रंथसेवा उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविला. या निर्णयामुळे लॉकडाऊनच्या कठीण काळातही हजारो वाचकांचा ज्ञानप्रवास अखंड सुरू राहिला.
त्यांच्या कार्यकाळात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम मार्गी लागले. तसेच राहाता आणि पाथर्डी येथे आधुनिक डिजिटल ग्रंथालय उपकेंद्रे उभारण्यात आली. जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत बांधकाम, दुरुस्ती आणि आवश्यक साधनसामग्रीसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ग्रंथालय क्षेत्रातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची कार्यशैली विशेष ठरली. कर्मचारी, ग्रंथपाल, संस्थाचालक आणि वाचनप्रेमी यांच्याशी सातत्याने संवाद साधत त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते केवळ अधिकारी न राहता ग्रंथालय परिवारातील एक विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या कार्याची दखल घेत डिसेंबर २०२३ पासून महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. राज्यातील ग्रंथालय व्यवस्थापन अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावली.
आता सहायक ग्रंथालय संचालक म्हणून नवी मुंबई येथे त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ कोकण विभागातील ग्रंथालय चळवळीला होणार आहे. तर दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचे नाव जिल्ह्याच्या ग्रंथालय चळवळीच्या इतिहासात कायम स्मरणात राहील, अशा भावना विविध ग्रंथालय संस्था, कर्मचारी आणि वाचनप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.
Comments
Post a Comment