अहिल्यानगर चे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून संजय मस्के
जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी अहिल्यानगरचे नवे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.
बिड येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून त्याच्या कडे चार्ज होता जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांची नवी मुंबई येथे बदली झाल्यानंतर संजय मस्के यांची अहिल्यानगर येथे बदली झाली आहे
संजय मस्के यांनी आपल्या सेवाकाळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विशेषतः जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती उभारण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रंथालय संचालनालयात त्यांची ओळख "वास्तुशिल्पकार अधिकारी" अशी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सुमारे आठ जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालयाच्या नव्या इमारतीचे कामही त्यांच्या नेतृत्वाखाली गती घेऊन लवकर पूर्ण होईल आणि वाचकांना सुसज्ज, आधुनिक ग्रंथालय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा वाचकवर्गातून व्यक्त होत आहे.
ग्रंथालय ही समाजाच्या बौद्धिक विकासाला दिशा देणारी आणि सातत्याने विस्तारत जाणारी संस्था आहे. वाचक, सभासद, ग्रंथसंपदा तसेच विविध माहिती साधनांमध्ये सातत्याने वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर ग्रंथालय चळवळीला नवी दिशा, आधुनिकता आणि गुणवत्तेची जोड देणारे अधिकारी म्हणून संजय मस्के यांचा राज्यभर लौकिक आहे. ते कुशल प्रशासक म्हणूनही ओळखले जातात.
मस्के यांनी आपल्या शासकीय सेवेला ग्रंथालय संचालनालय, मुंबई येथून प्रारंभ केला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, धुळे आणि बीड या ठिकाणी विविध पदांवर कार्यरत राहून ग्रंथालय क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये काम केले, तेथे ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करून अनेक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले.
ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी ई-ग्रंथालय सेवा प्रभावीपणे कार्यान्वित केली. या उपक्रमामुळे प्रथमच ग्रंथालयातील पुस्तके आणि सेवा वाचकांच्या मोबाईल व लॅपटॉपपर्यंत पोहोचली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाचन संस्कृतीला नवे स्वरूप देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
देशातील अग्रगण्य संस्था राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, कोलकाता यांच्या विविध योजनांचा लाभ राज्यातील अनेक ग्रंथालयांना मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांनाही विविध शासकीय व केंद्रीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे, प्रमोद गिरी, संतोष कापसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव शेळके, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शिंदे, अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल आमोल इथापे, पारनेर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय ढोळ, लक्ष्मण खोडदे यांच्यासह ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यात वाचन संस्कृतीला चालना देणे, ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करणे आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत ज्ञानसंपदा अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, या दृष्टीने संजय म्हस्के यांच्या नियुक्तीकडे ग्रंथप्रेमी आणि ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment