श्रीरामपूरात मोकाट रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी वर कारवाई

मोकाट फिरणाऱ्या सह सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना पोलिसांचा दणका
घाडगे न्यूज| प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी विनाकारण मोकाट फिरणाऱ्या, मोकळ्या मैदानांवर बसून मद्यपान करणाऱ्या तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पुढाकारातून रविवारी रात्री श्रीरामपूर शहरातील विविध मोकळ्या मैदानांवर अचानक पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे ३२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशालखैरे तसेच आरसीपी पथकाने शहरातील विविध ठिकाणी अचानक गस्त घातली. या पथकाने थत्ते मैदान तसेच महाले-पोद्दार शाळेसमोरील क्रिकेट मैदान येथे विशेष तपासणी केली.
या मैदानांवर रात्रीच्या वेळी विनाकारण बसून राहणाऱ्या तरुणांची तसेच मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, विनाकारण गर्दी करणे आणि नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने वर्तन करणाऱ्या सुमारे ३२ व्यक्तींवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
गोंधवणीसह बाहेरील परिसरातील तरुणांचीही उपस्थिती
या कारवाईदरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरासह इतर भागांतील तसेच शहराबाहेरील काही तरुण रात्रीच्या वेळी या मोकळ्या मैदानांवर येऊन बसत होते. काही जण केवळ गप्पागोष्टी करण्यासाठी येथे थांबत असल्याचे आढळले, तर काही जणांकडून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केले जात असल्याचेही समोर आले.
रात्रीच्या वेळी मोकळ्या मैदानांवर तरुणांच्या टोळ्या बसणे, मोठ्या आवाजात गप्पा मारणे, मद्यपान करणे अथवा हुल्लडबाजी करणे यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः कुटुंबासह रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारामुळे अस्वस्थता निर्माण होत होती.
नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा पुढाकार
थत्ते मैदान तसेच इतर परिसरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या या प्रकारांबाबत स्थानिक नागरिकांकडून पोलिसांकडे तक्रारी वाढत होत्या. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच विनाकारण गर्दी करून वातावरण बिघडविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.
या तक्रारींची दखल घेत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी स्वतः पुढाकार घेत रविवारी रात्री अचानक तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे मैदानांवर बसलेल्या तरुणांची चांगलीच धावपळ उडाली.
दोन वाहनांवरील ब्लॅक फिल्मवरही कारवाई
याच कारवाईदरम्यान थत्ते मैदान परिसरात दोन चारचाकी वाहने पूर्णपणे ब्लॅक फिल्म लावलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी या वाहनांची तपासणी करून संबंधित वाहनचालकांवरही कारवाई केली. वाहनांच्या काचांवर नियमबाह्य पद्धतीने ब्लॅक फिल्म लावून फिरणाऱ्यांवरही यापुढे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार
श्रीरामपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून यापुढेही अशाच प्रकारच्या अचानक तपासण्या आणि गस्ती सुरू ठेवण्यात येणार आहेत. मोकळ्या मैदानांवर, सार्वजनिक ठिकाणी अथवा नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरात मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या किंवा नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने वर्तन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्रीच्या वेळी कुटुंबासह बाहेर पडणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या अचानक कारवाईचे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, हुल्लडबाजी आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त व कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार