राहरी तालुका क्रिडा समितीच्या अध्यक्षपदी नितीन घोलप
राहुरी | प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप देण्याच्या उद्देशाने राहुरी तालुका क्रीडा समितीची सन २०२६-२७ या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील शालेय तसेच विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे, गुणवंत खेळाडूंच्या क्रीडागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विविध क्रीडा उपक्रमांचे प्रभावी नियोजन करण्याची जबाबदारी नवनियुक्त कार्यकारिणीवर सोपविण्यात आली आहे.
समितीच्या क्रीडा अध्यक्षपदी नितीन घोलप यांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा उपाध्यक्षपदी बाबासाहेब जाधव, संतोष बर्डे, दादासाहेब वाघ, परब सूर्यवंशी आणि धनंजय करपे यांची निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी गणेश म्हसे, तर उपकार्याध्यक्षपदी गणेश भांड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीच्या कामकाजाची धुरा सचिव अभयसिंह पाटील आणि सहसचिव सुशांत आरंगळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. समितीच्या उपक्रमांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी प्रमुख विनायक गोरे आणि सहप्रसिद्धी प्रमुख संजय विटनोर यांची निवड करण्यात आली आहे.
आर्थिक कामकाजासाठी खजिनदार किशोर शिंदे, तर सहखजिनदार सुनील जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून घनश्याम सानप, तर महिला प्रतिनिधी म्हणून सुरेखा माकोने यांची निवड करण्यात आली आहे.
समितीला मार्गदर्शन करण्यासाठी आप्पासाहेब शिंदे, संजय कंगले, प्रकाश मोढे, बबन लांडगे आणि भानुदास तमनर यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.
गुणवंत खेळाडूंना मिळणार व्यासपीठ
राहुरी तालुक्यात विविध क्रीडा प्रकारांमध्ये अनेक गुणवंत खेळाडू असून, त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्पर्धेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समितीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंची गुणवत्ता शोधून त्यांना जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळावी, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
शालेय क्रीडा स्पर्धा, तालुकास्तरीय निवड चाचण्या, प्रशिक्षण शिबिरे आणि विविध क्रीडा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यावर समितीचा भर राहणार आहे. युवकांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करून त्यांचा शारीरिक व मानसिक विकास साधण्याबरोबरच तालुक्यात क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी नवीन कार्यकारिणी प्रयत्नशील राहणार आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि तालुक्यातील अनेक खेळाडू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करतील, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment