महात्मा फुले विद्यापीठांच्या संशोधनाचा डंका
संशोधन।शिवाजी घाडगे
महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 54 वी बैठक संपन्न झाली. राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दृकश्राव्य माध्यमातून बैठकीला शुभेच्छा दिल्या. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी, खारजमीन विकास मंत्री भरतशेठ गोगावले, वित्त नियोजन कृषि मदत व पुनर्वसन विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री डॉ. आशिष जयस्वाल, कृषि सचिव परिमल सिंग, कृषि परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू व आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीच्या समारोप प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी कृषि आयुक्त सुरज मांढरे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे उपस्थित होते. चारही कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन, कृषि परिषदेचे संचालक संशोधन व कृषि परिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे 11 वाण राज्यस्तरावर, 11 वाण राष्ट्रीय स्तरावर,4 कृषि यंत्रे अवजारे, 77 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी, 6 निष्कर्ष आणि दोन जैविक अजैविक ताण सहन करणारा स्रोत यांना मान्यता देण्यात आली. यामध्ये राज्यस्तरावर प्रसारित झालेल्या वाहनांमध्ये संकरित बाजरी- फुले बहिणाई, भात-फुले मावळ 9, भात-फुले सुपर राधा, रब्बी ज्वारी-फुले यशस्वी, रब्बी ज्वारी-फुले तेजस्वी, संकरीत सुर्यफुल-फुले अर्णव, द्राक्ष-मांजरी मंजुळा (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे), द्राक्ष-मांजरी मधुरा (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे), गार्लिक चाईव्हज (लसूण पात)-भीमा हरिता(कांदा व लसुन संशोधन संचालनालय, राजगुरुनगर), चवळी-फुले वर्षा, निशिगंध-फुले सुगंधा हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच फुले लिंबू काढणी यंत्र, फुले सोयाबीन कापणी यंत्र, सेन्सर आधारित फुले केळ फुल इंजेक्टर, फुले स्लरी अॅप्लिकेटर यंत्र प्रसारीत करण्यात आले.
प्रसारीत वाण
संकरित बाजरी - फुले बहिणाई (डीएचबीएच 1774): संकरित बाजरीचा हा फुले बहिणाई वाण अधिक धान्य उत्पादन (40.84 क्वि. प्रति हेक्टर), घट्ट कणीस, गोलाकार करड्या रंगाचे दाणे, गोसावी व करपा रोगास प्रतिकारक्षम असलेला हा वाण महाराष्ट्रात उन्हाळी हंगामासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
भात - फुले मावळ - 9 (व्हीडीएन-2018):फुले मावळ-9 हा तुल्यवान पवनापेक्षा 22.6% जास्त उत्पादन देणारा, उशीरा पक्व होणारा व दाणे न गळणारा वाण, खोडकिडीस प्रतिकारक्षम असलेला वाण महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
भात-फुले सुपर राधा (आरडीएन एमएबीसी-5):भाताचा फुले सुपर राधा हा वाण अधिक धान्य उत्पादन (48.23 क्वि. प्रति हेक्टर), मध्यम परिपक्वता कालावधी, खोड किडीस प्रतिकारक्षम, जेल सुसंगता व जिलेटीनायझेशन तापमान मध्यम असल्याने शिजवल्यानंतर चांगली गुणवत्ता असणारा हा वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
रब्बी ज्वारी-फुले यशस्वी (आर.एस.व्ही. 1959-4) रब्बी ज्वारीचा फुले यशस्वी (आर.एस.व्ही. 1959-4) हा मध्यम परिपक्वता कालावधी तसेच अधिक धान्य उत्पादन (41.6 क्वि. प्रति हेक्टर), रेवती वाणास पर्यायी वाण, खोडमाशीस प्रतिकारक्षम व खडखड्या रोगास मध्यम प्रतिकारक असलेला हा वाण महाराष्ट्रात भारी जमिनीत बागायती लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.
रब्बी ज्वारी- फुले तेजस्वी (आर.एस.व्ही. 2515): रब्बी ज्वारीचा फुले तेजस्वी (आर.एस.व्ही. 2515) हा मध्यम परिपक्वता कालावधी तसेच अधिक धान्य उत्पादन (23.4 क्वि. प्रति हेक्टर), खोडमाशीस प्रतिकारक्षम व खडखड्या रोगास प्रतिकारक असलेला हा वाण महाराष्ट्रात मध्यम जमिनीत जिरायती लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.
संकरीत सुर्यफुल-फुले अर्णव (एसव्हीएसएच-527) संकरीत सुर्यफुलाचा फुले अर्णव (एसव्हीएसएच-527) हा वाण अधिक बियाणे उत्पादन (20.97 क्वि. प्रति हेक्टर), तेलाचे अधिक प्रमाण (39.0 टक्के), लवकर परिपक्वता कालावधी असणारा, अल्टरनेरीया पानांवरील करपा, भुरी आणि केवडा रोगाला मध्यम प्रतिकारक्षम असणारा हा वाण महाराष्ट्रातील खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
द्राक्ष-मांजरी मंजुळा (एच 84-24) (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे) द्राक्षाचा मांजरी मंजुळा (एच 84-24) हा वाण अधिक उत्पादन (32.30 टन प्रति हेक्टर), मण्याचे अधिक वजन (9.03 ग्रॅम), उशीरा परिपक्व होणारा रंगीत द्राक्षाचा हा वाण पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
द्राक्ष- मांजरी मधुरा (एच 19-24) (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे) द्राक्षाचा मांजरी मधुरा (एच 19-24) हा वाण अधिक उत्पादन (42.44 टन प्रति हेक्टर), खाण्यासाठी व बेदाण्यासाठी उपयुक्त, उशीरा परिपक्व होणारा, केवडा आणि भुरी रोगास मध्यम प्रतिकारक्षम असणारा शीतगृहामध्ये (20 से) 32 दिवसांपर्यंत साठवण क्षमता असणारा हा वाण पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
गार्लिक चाईव्हज (लसूण पात)-भीमा हरिता (ऑल 1587) (कांदा व लसुन संशोधन संचालनालय, राजगुरुनगर) गार्लिक चाईव्हज (लसूण पात) भीमा हरिता (ऑल 1587) हा वाण पातीचे उत्पादन (132 टन प्रति हेक्टर), लागवडीनंतर पाच वर्षांपर्यंत उत्पादन देणारा, प्रत्येक महिन्याला कापणी करता येत असल्यामुळे वर्षभर उत्पादन, अॅलिसिन आणि फ्लेव्होनॉइडस यांचा समृध्द स्त्रोत असणारा, फुलकिडे व जांभळा करपा रोगास प्रतिकारक्षम असलेला हा वाण प्रसारीत करण्यात आला आहे.
चवळी-फुले वर्षा (आरएचआरसीपी-4) चवळीचा फुले वर्षा (आरएचआरसीपी-4) हा वाण खरीपामध्ये अधिक हिरव्या शेंगाचे उत्पादन (89.20 क्वि. प्रति हेक्टर), रब्बी हंगामात (82.96 क्वि. प्रति हेक्टर) उत्पादन, तांबेरा, भुरी आणि मोझॅक या रोगास मध्यम प्रतिकारक्षम, मावा, तुडतुडे, शेंगा पोखरणारी अळी व खोडमाशी या किडीस कमी प्रमाणात बळी पडणारा हा वाण महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
निशिगंध-फुले सुगंधा (जीके-टी-एस-1) निशिगंधाचा फुले सुगंधा (जीके-टी-एस-1) हा वाण 7 ते 7.5 लाख फुलदांडे प्रति हेक्टर उत्पादन असणारा, फुलदांड्याची सरासरी लांबी 116.05 से.मी. तसेच सुटी फुले आणि फुलदांड्यांसाठी उपयुक्त असणारा हा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
प्रसारीत यंत्रे
फुले लिंबू काढणी यंत्र 21 ते 23 किलो प्रति तास लिंबू काढणी क्षमता असलेले, लिंबू काढतांना हाताला इजा न होणारे तसेच काढलेले लिंबू कापडी पिशवीमध्ये सहजपणे जमा करता येणारे व पारंपारीक पध्दतीपेक्षा लिंबू काढणी अधिक कार्यक्षमपणे करता येणारे हे फुले लिंबू काढणी यंत्र प्रसारीत करण्यात आले आहे.
फुले सोयाबीन कापणी यंत्र 21 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रक्टरसाठी योग्य असणारे, फ्रंट माउंटिंग सिस्टीम व हायड्रॉलिक प्रणालीद्वारे चालणारे, 0.22 हेक्टर प्रति तास कार्यक्षमता असणारे तसेच पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये 60 टक्के बचत करणारे हे फुले सोयाबीन कापणी यंत्र प्रसारीत करण्यात आले आहे.
सेन्सर आधारित फुले केळ फुल इंजेक्टर सेन्सर आधारित अचूक रासायनीक फवारणी करता येणारे, कमी रासायनीक अपव्यय असलेले, डागविरहीत केळींचे प्रमाण अधिक, स्वयंचलीत कट ऑफ प्रणाली, बॅटरीवर चालणारे पोर्टबल युनिट व श्रमांमध्ये बचत, एकसमान फवारणी अशी वैशिष्ट्ये असणारे हे सेन्सर आधारित फुले केळ फुल इंजेक्टर प्रसारित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment