अहमदनगर जिल्हा बॅकेला 99.27मतदान
अहिल्यानगर जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव; ९९.२७ टक्के विक्रमी मतदान
राहुरी - प्रतिनिधी
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील विविध सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ९९.२७ टक्के मतदान झाले असून, हे आजवरचे सर्वाधिक मतदान मानले जात आहे.
दरम्यान संगमनेर येथील मतदान केंद्रामध्ये मतपत्रिकेची व्हिडिओ शूटिंग केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिलेला आहे.
जिल्ह्यात एकूण ३८४७ मतदार होते. त्यापैकी ३८०९ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. केवळ ३८ मतदार अनुपस्थित राहिले. प्राथमिक कृषी, बिगरशेती आणि शेतीपूरक या तीन प्रमुख मतदारसंघांसह राखीव प्रवर्गासाठी हे मतदान घेण्यात आले.
पाच तालुक्यांचा आदर्श - शंभर टक्के मतदान
जिल्ह्यातील अकोले, नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या पाच तालुक्यांनी १०० टक्के मतदान करून आदर्श निर्माण केला आहे.
अकोले तालुक्यात २३१ पैकी २३१, नेवासा तालुक्यात २४६ पैकी २४६, पाथर्डी तालुक्यात १३१ पैकी १३१, श्रीगोंदा तालुक्यात २९९ पैकी २९९ आणि श्रीरामपूर तालुक्यात १४७ पैकी १४७ मतदारांनी मतदान केले. या तालुक्यांमध्ये एकही मत वाया गेले नाही.
इतर तालुक्यांची आकडेवारी
संगमनेर तालुका हा मतदार संख्येच्या बाबतीत जिल्ह्यात सर्वात मोठा ठरला. येथे ७१५ मतदारांपैकी ७१४ जणांनी मतदान केले असून टक्केवारी ९९.८६% आहे. कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक ५२९ मतदार होते, त्यापैकी ५२० जणांनी मतदान केले (९८.३०%).
जामखेड - ११५ पैकी ११४ (९९.१३%), कर्जत - १६८ पैकी १६७ (९९.४०%), पारनेर - २२७ पैकी २२५ (९९.१२%), नगर - ३९१ पैकी ३८७ (९८.९८%), राहाता - २६३ पैकी २६० (९८.८६%), शेवगाव - ११७ पैकी ११५ (९८.२९%) आणि राहुरी तालुक्यात २५८ पैकी २५३ मतदारांनी मतदान केले असून ९८.०६% टक्केवारीसह हा जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान असलेला तालुका ठरला आहे.
मतदारसंघनिहाय चित्र
या निवडणुकीत बिगरशेती मतदारसंघात बहुतांश ठिकाणी मतदार संख्या शून्य असल्याने तेथे मतदानाची प्रक्रिया झाली नाही. तर शेतीपूरक आणि प्राथमिक कृषी मतदारसंघात जवळपास सर्वच ठिकाणी १०० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राखीव प्रवर्गातही मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून सरासरी ९८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्व ३३ मतदान केंद्रांवर मतदान अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उच्चांकी मतदान झाल्याने आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment