बँकेच्या चेअरमन डाॅ सुजय विखे-पाटील? खासदार निलेश लंके बॅकेत
जिल्हा बँकेचे चेअरमन माजी खासदार डॉ सुजय विखे-पाटील ?
झाली एकदाची अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेची निवडणूक
तशी निवडणूक ही नाम मात्र होती कारण आगोदर 11 जागा बिनविरोध झाल्या अण 10 जागेवर सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली मंगळवारी 3 नोव्हबरला निकाल लागला आता बॅकेचे चेअरमन माजी खासदार डॉ सुजय विखे-पाटील हे होणार हे निश्चित आता फक्त औपचारिक बाकी
दुसरे विशेष म्हणजे आता संचालक म्हणून खासदार निलेश लंके ही बॅकेच्या कारभारावर लक्ष ठेवून असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा बॅकेचा चेअरमन ठरवणार असतील तर तो नेमका कोण असणार ऐनवेळेस काही होऊ शकते असा तुचोवाच खुद्द डाॅ सुजय विखे-पाटील यांनी दिली मग काय महिला चेअरमन होणार?
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांनी दमदार प्रवेश केला आहे. ‘ मी येत असतो,’ असे विरोधकांना ठणकावून सांगणाऱ्या खासदार लंके यांनी आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या राजकारणात त्यांना प्रवेश मिळू नये, यासाठी विविध राजकीय समीकरणे आखली गेल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व समीकरणांना छेद देत लंके यांनी विजय मिळविल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात एकूण १०४ मतदार होते. या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार नीलेश लंके यांना छत्री या चिन्हावर ६३ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल शिंदे यांना कपबशी या चिन्हावर ४० मते मिळाली. एक मत बाद झाले. त्यामुळे २३ मतांच्या फरकाने खासदार नीलेश लंके यांनी विजय मिळविला. हा विजय केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून जिल्हा बँकेच्या राजकारणात लंके यांच्या प्रवेशाची राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण नोंद मानली जात आहे.
अकरा संचालक बिनविरोध; लंके यांना रोखण्याची रणनीती?
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच अकरा संचालक बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख, आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, बिपीन कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, नगराध्यक्ष करण ससाणे, दत्तात्रय पानसरे, सचिन घुमरे आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते एकत्र आले असताना खासदार नीलेश लंके यांना जिल्हा बँकेत प्रवेश मिळू नये, यासाठी काही राजकीय हालचाली झाल्या असाव्यात, अशी चर्चा निवडणुकीदरम्यान होती. मात्र, लंके यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका ठाम ठेवली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरील राजकीय निर्णय आणि सभापतीपदाची घटनात्मक जबाबदारी लक्षात घेता शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेत लंके यांच्यापासून अंतर राखल्याचे दिसून आले. असे असले तरी राम शिंदे समर्थक ज्योती शिंदे यांनी निवडणुकीत विजय मिळविला आहे.
दरम्यान, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार नीलेश लंके यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे यांनीही निवडणूक लढविली; मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे लंके-लोखंडे गटाला काही ठिकाणी यश, तर काही ठिकाणी अपयश स्वीकारावे लागले.
अकोल्यात आमदार लहामटे यांना धक्का
अकोले सेवा सोसायटी मतदारसंघातील निवडणूकही विशेष चर्चेची ठरली. विद्यमान आमदार किरण लहामटे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अपक्ष उमेदवार संजीवनी शिंदे यांनी त्यांचा पराभव करीत विजय संपादन केला. संजीवनी शिंदे या जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या आहेत. विद्यमान आमदाराचा पराभव झाल्याने अकोले तालुक्यातील राजकीय समीकरणांवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा आमदार लहामटे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे यांचा दणदणीत विजय
राहुरी सेवा सोसायटी मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपचे देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचा पराभव केला. आमदार तनपुरे यांना ८१ मते मिळाली, तर सत्यजित कदम यांना १८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे राहुरीतील या निवडणुकीत तनपुरे यांनी आपले राजकीय वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले.
इतर मतदारसंघांतील विजयी उमेदवार
शेतीपूरक मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे यांनी ७५० मते मिळवत विजय संपादन केला. ओबीसी प्रवर्गातून कारभारी जाधव यांनी २ हजार ५७६ मते मिळवून बाजी मारली. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून वैभव पिचड यांनी २ हजार ६९० मते मिळवत विजय मिळविला, तर भटक्या विमुक्त प्रवर्गातून गणपतराव सांगळे यांनी २ हजार ४६९ मते मिळवून विजयावर शिक्कामोर्तब केले.
सेवा सोसायटीच्या चार जागांमध्ये विखे-थोरात-गडाख गट, लंके-लोखंडे गट आणि राम शिंदे गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात सर्वच गटांना काही प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले असले, तरी सहकार पॅनलने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
सहकार पॅनलचे वर्चस्व कायम
निवडणुकीच्या एकूण निकालाचा विचार करता सहकार पॅनलने १७ जागांवर विजय मिळवत जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. राम शिंदे गटाला दोन जागा, परिवर्तन पॅनलच्या लंके-लोखंडे गटाला एक जागा, तर अकोलेतील एक जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा विखे-थोरात-गडाख यांच्या सहकार पॅनलकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, खासदार नीलेश लंके यांच्या विजयामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात विरोधी गटाला नवी ताकद मिळाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालामुळे लंके-लोखंडे गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सहकार क्षेत्रातील आर्थिक गणिते आणि राजकीय तडजोडी!
जिल्हा सहकारी बँकेचे आर्थिक गणित प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने, पतसंस्था आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांभोवती फिरत असते. या संस्थांचे जिल्हा बँकेशी मोठे आर्थिक व्यवहार आणि कर्जाचे संबंध असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नाही.
राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेने जप्त केल्याची पार्श्वभूमी या निवडणुकीतील राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची ठरली. सत्ताधारी गटाशी संघर्ष करून सहकार क्षेत्रातील आर्थिक अडचणी आणखी वाढविण्यापेक्षा सत्तेच्या प्रवाहाबरोबर राहणे अधिक सोयीचे ठरू शकते, अशी भूमिका ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांनी घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाशी त्यांनी सहकार बँकेच्या निवडणुकीत जुळवून घेतल्याचे चित्र दिसले.
विशेष म्हणजे संगमनेरमध्ये मतदारांची संख्या मोठी असतानाही थोरात यांनी दोन पावले मागे घेत आपल्या जावयांना रणजित देशमुख यांना बिनविरोध निवडून आणण्याचा मार्ग स्वीकारला. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी एकत्र येण्यामागे केवळ राजकीय समीकरणे नसून सहकारी संस्थांचे आर्थिक हितसंबंधही महत्त्वाचे असल्याचे या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे.
जिल्हा बँकेच्या पहिल्या चेअरमनपदाची उत्सुकता!
जिल्हा सहकारी बँकेच्या पहिल्या चेअरमनपदाबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना बँकेचे चेअरमनपद मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. आता निवडणुकीतील सहकार पॅनलचे वर्चस्व पाहता त्यांच्या नावाची चर्चा अधिक जोर धरू शकते. मात्र, त्यांना हे पद मिळाल्यास पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाचा राजीनामा द्यावा लागणार का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
त्यामुळे बँकेच्या चेअरमनपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
एकंदरीत, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख यांच्या सहकार पॅनलने सत्ता टिकवली असली, तरी खासदार नीलेश लंके यांनी मिळविलेला विजय हा या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा राजकीय घटनाक्रम ठरला आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या एकजुटीसमोर लंके यांनी आपली ताकद दाखवून दिली. आता बँकेच्या चेअरमनपदाची निवड आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या नव्या राजकीय समीकरणांचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments
Post a Comment