पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला शेतकऱ्यांच्या घरी पिठल भाकरीचा अस्वाद
भाष्य ॥शिवाजी घाडगे
दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबांसाठी यंदाची दिवाळी दुष्काळाचे सावट, पाण्याची टंचाई, पिकांचे नुकसान आणि आर्थिक विवंचना घेऊन आली आहे. घरात दिवाळीचा दिवा पेटविताना शेतकऱ्यांच्या मनात मात्र पुढील हंगामाची चिंता आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कळसपिंपरी येथील शेतकरी भिवसेन शंकर भवार यांच्या घरी जाऊन साजरी केलेली दिवाळी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वडील दिवंगत खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांची अनेकांना आठवण झाली
दिवंगत खासदार विखे-पाटील अनेकदा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत तेथील परिस्थिती समजून घेत पिठल भाकरीचे जेवण घेत असत
केवळ एक औपचारिक भेट म्हणून पाहता येणार नाही. त्यामागे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा आणि त्यांना आधार देण्याचा संदेश दडलेला आहे.
सत्तेच्या राजकारणात अनेकदा सामान्य माणसाचे प्रश्न भाषणांपुरते मर्यादित राहतात. व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्याच्या अडचणी समजून घेणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विखे-पाटील यांनी शेतकऱ्याच्या घरी जाऊन जमिनीवर बसून पिठलं-भाकरीचे जेवण केले, कुटुंबीयांशी संवाद साधला, मुलांना मिठाई व फटाके दिले आणि दिवाळीच्या आनंदात सहभागी झाले. या कृतीतून मंत्री आणि सामान्य शेतकरी यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न दिसून येतो.
मात्र, अशा भेटींचे खरे महत्त्व छायाचित्रे, प्रसिद्धी किंवा राजकीय संदेशापुरते मर्यादित राहता कामा नये. शेतकऱ्याला दिवाळीच्या दिवशी दिलासा देणे महत्त्वाचे असले, तरी त्याच्या आयुष्यातील कायमस्वरूपी अंधार दूर करणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. आज शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाई, उत्पादन खर्चात वाढ, शेतीमालाला योग्य भाव, कर्जाचा बोजा, वीजपुरवठा आणि जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न आ वासून उभे आहेत. या प्रश्नांची उत्तरे केवळ आश्वासनांनी मिळणार नाहीत, तर ठोस निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणीतूनच मिळतील.
कळसपिंपरी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना गावाच्या पाणीप्रश्नाची पालकमंत्र्यांनी दखल घेतली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून पाणीपुरवठा योजनेवर फिल्टर प्लांट बसविण्याबाबत सूचना दिल्या. ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, या सूचनांचे प्रत्यक्ष कामात रूपांतर किती लवकर होते, यावरच प्रशासनाच्या संवेदनशीलतेची खरी परीक्षा होणार आहे. चारा उपलब्धतेबाबतचे नियोजनही कागदावर न राहता शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचले पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. अग्रीम मदत, कर्जमाफी आणि वीजबिलासंदर्भातील निर्णयांचा उल्लेखही त्यांनी केला. शासनाच्या मदतीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळू शकतो. परंतु मदत वेळेवर आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला मदतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
दिवाळीच्या निमित्ताने एखाद्या शेतकरी कुटुंबाच्या घरात जाऊन पणती पेटविणे ही माणुसकीची कृती आहे. राजकीय पदे आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवून सामान्य कुटुंबासोबत भोजन करणे ही लोकप्रतिनिधींनी जपण्यासारखी परंपरा आहे. मात्र, या पणतीचा प्रकाश एका दिवसापुरता मर्यादित राहू नये. शेतकऱ्यांच्या जीवनात कायमस्वरूपी आशेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी अशाच आस्थेने त्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची गरज आहे.
शेतकऱ्याला दिवाळीत मिठाई मिळाली, मुलांच्या हातात फटाके आले आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, हे निश्चितच समाधानकारक आहे. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा पाण्याची चिंता, पिकांची काळजी आणि आर्थिक विवंचना त्याच्या दारात उभी राहणार असेल, तर त्या आनंदाला मर्यादा आहेत. म्हणूनच पालकमंत्र्यांच्या या दिवाळी भेटीचे खरे यश त्यांच्या पुढील कृतीतून सिद्ध होईल.
शेवटी, शेतकऱ्याच्या घरी जाऊन पिठलं-भाकरी खाणे हा संवेदनशीलतेचा चांगला संदेश आहे; पण शेतकऱ्याच्या घरातील चूल वर्षभर पेटती राहील, त्याच्या शेताला पाणी मिळेल आणि त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळेल, याची व्यवस्था करणे हीच खरी लोकसेवा आहे. राजकारणातील दिवाळी एका दिवसाची असते, पण शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत, हीच खरी अपेक्षा!
Comments
Post a Comment