शासन आपल्या दारी
शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम” जिल्ह्यात 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून मोहीम यशस्वी करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिल्यात.
" शासन आपल्या दारी या उपक्रमा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार , सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, या उपक्रमाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले असून या अभियानात नागरिकांना, शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ द्यावा. ग्रामपंचायत स्तरावर या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी करून, विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करून घ्यावेत, त्यानंतर सर्व अर्जांची तलाठी कार्यालयात छाननी करून, तालुकास्तरावर सर्व पात्र अर्ज लाभासाठी अंतिम करावेत. शासन आपल्या दारी या उपक्रमाची 15 जून2023 पर्यंत कालबद्ध मोहीम असून, या मोहिमेत गावागावातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना सहभागी करून घेऊन लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.या आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
Comments
Post a Comment