आचारसंहितेचे उल्लंघन करु नका नाहीतर कारवाई- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करा-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सर्व शासकीय-निमशासकीय विभागांनी निवडणूक आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील आणि विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय इमारती आणि त्यांच्या संरक्षक भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, कापडी फलक, कटआऊट, जाहिरात फलकावरील संदेश, झेंडे इत्यादी तात्काळ काढावीत. सार्वजनिक जागेवरील सर्व राजकीय जाहिराती, भित्तीपत्...