हैदराबादहून हवेत उडणारे बलुन जिल्ह्यातुन जाणारे
हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही विशेष प्रतिनिधी/घाडगे न्यूज हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे. ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री ८ ते सकाळी ६.३० या वेळेत होतील. या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. ...