तंत्रज्ञानच्या आरशात आरशात दिसले बालपन
तंत्रज्ञानाच्या आरशात दिसलेले आपलेच बालपण! भाष्य।शिवाजी घाडगे जशी एखादी चिमणी आपल्या गाडीच्या आरशात बसून आपलेच रूप न्याहाळते, तसेच गेल्या काही दिवसांत अनेकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेल्या आपल्या जुन्या व नव्या छायाचित्रांकडे पुन्हा पुन्हा पाहिले आणि त्या आठवणींमध्ये अक्षरशः रमून गेले. कुणी आपल्या बालपणातील रूप पाहिले, कुणी तरुणपणातील चेहरा पाहिला, तर कुणी आई-वडिलांसोबतचे जुने दिवस नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा डोळ्यांसमोर उभे केले. या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—तंत्रज्ञान कितीही आधुनिक झाले, तरी माणसाच्या आठवणी मात्र कायम जुन्याच असतात. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले छायाचित्र जणू काळाच्या पडद्याआड नेऊन पुन्हा आपल्यासमोर आणले आहे. चार-पाच दशकांपूर्वी आपण कसे दिसत होतो, आपले बालपण कसे होते, तरुणपणीचा चेहरा कसा होता, आपल्या आजूबाजूला कोणती माणसे होती, हे पाहण्याची एक वेगळीच संधी या तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली. विशेषतः ज्यांचे वय आता ४६ वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांनी या छायाचित्रांकडे पाहताना केवळ स्वतःचा चेहरा पाहिला नस...