गाळयुक्त शिवार शेतजमीन झाली सुपीक
अहिल्यानगर जिल्ह्यात गाळयुक्त शिवार’मुळे ३८३९ हेक्टर जमीन झाली सुपीक राहुरी जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. गत तीन वर्षांत जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ७१.९१ लाख घनमीटर गाळाचा उपसा करुन हा गाळ ३८३९ हेक्टर शेतजमिनीवर टाकून पसरविण्यात आला . याचा लाभ संबंधित २७६० शेतकऱ्यांना झाला . गाळ उपसल्यामुळे जलसाठ्यांची क्षमता वाढण्यास मदत झाली असून, अंदाजे ७१०० घनमीटर इतका अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होण्यास हातभार लागला आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे यांनी दिली. जलसंधारण सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाच्या विविध उपक्रमांना गती देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतून एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य होत आहेत. एकीकडे धरणे, तलाव, बंधारे व नाल्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून जलसाठवण क्षमता वाढविण्यात येत आ...