नगर मनमाड राज्य मार्ग पुर्ण होणार केव्हा
अपुर्ण नगर मनमाड महामार्ग पुर्ण होणार केव्हा भाष्य घाडगे न्यूज | शिवाजी घाडगे आपल्याला स्वतःच्या जीवाची किंमत माहीत असेल, तर नगर–मनमाड राज्य मार्गावर सध्या प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणेच आहे. गेल्या एका वर्षात या रस्त्याने तब्बल ५५ निष्पाप प्रवाशांचे बळी घेतले, अनेकांना आयुष्यभराचे अपंगत्व दिले. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासन बघ्याची भूमिका घेत बसले आहे. इच्छा असूनही काहीच न करणे, हीच आज या यंत्रणेची ओळख बनली आहे. आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला—अगदी तशीच अवस्था! या रस्त्यावर अब्जावधी रुपये गिळंकृत झाले. खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण खड्डे मात्र आजही जिवंत आहेत. काम अर्धवट सोडून गेलेले ठेकेदार मोकाट फिरत आहेत. त्यांना ना काळ्या यादीत टाकले, ना एकही जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई झाली. मग प्रश्न असा आहे—हे पैसे गेले कुठे? आणि या मृत्यूंची जबाबदारी कोणाची? रस्ता आधी पूर्ण करण्याऐवजी महामार्गाच्या कडेला गटारे बांधण्याची घाई सुरू आहे. कदाचित मायबाप सरकारला रस्त्यापेक्षा गटारच अधिक प्रिय असावे. कुणा उद्योगपतीची वासाची पाइपलाइन सुरक्षित राह...