विभागीय कृषी संशोधन बैठक पुण्यात सुरु

पुणे येथे खरीप हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न
कृषि विद्यापीठे हे ज्ञानाचे स्रोत
- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

महात्मा फुले कृषि विद्यापीठ स्थापन झाल्यापासून विद्यापीठाने  294 वाण,  1774 कृषी तंत्रज्ञान शिफारशी व 46 सुधारित अवजारे  प्रसारित केली आहे. मागच्या वर्षी विद्यापीठाने  चार वाण, 69 शिफारशी व तीन सुधारित अवजारे  प्रसारित केले आहे. विद्यापीठे ज्ञानाचा स्रोत आहे आणि हे ज्ञान कृषि विभागामार्फत विस्तारित केले जाते. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग हे शेतकऱ्यांसाठी  कायम कार्यशील आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.  
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कामधेनु सभागृह, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती खरीप-2023 च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषि आयुक्त  सुनिल चव्हाण उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, आत्माचे संचालक  दशरथ तांभाळे, पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कृषी सहसंचालक श्री सुनील बोरकर,गणेशखिंड येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. रविंद्र बनसोड उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की या बैठकीमध्ये गतवर्षी पारित झालेल्या संशोधन शिफारशींचे प्रत्याभरण कृषी विभागाकडून मिळणे अपेक्षित आहे तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावरही प्रत्याभरण कृषी विभागाकडून मिळणे गरजेचे आहे. या प्रत्याभरणावर शेतकरीभिमुख संशोधनाची दिशा ठरवता येते.  
आयुक्त सुनिल चव्हाण यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना म्हणाले एल-निनो आणि बीपरजोय या वादळामुळे मान्सून लांबलेला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी त्यांच्या खरीप पिकाचे कसे नियोजन करावे यावर या बैठकीत चर्चा व्हावी. राज्यात तूर आणि सूर्यफुलाचे क्षेत्र कमी होत आहे ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. कृषी विद्यापीठाने शिफराशीत केलेले विविध पिकांचे वाण,तंत्रज्ञान  व अवजारे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे याचा विस्तार केला जाईल. कृषी विभाग हे कृषि विद्यापीठ आणि शेतकऱ्यांमधील दुवा आहे. राज्याच्या कृषि विभागाचे  कृषि विद्यापीठांना संपूर्ण सहकार्य असल्याचे ते म्हणाले. 
या वेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी विद्यापीठाने मागील वर्षात प्रसारित केलेले पिकांचे विविध वाण, यंत्रे, पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी याचे सादरीकरण केले. संचालक विस्तार शिक्षण डॉ. चिदानंद पाटील यांनी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री सुगी खरीप व इतर प्रकाशनांचे विमोचन तसेच विविध तंत्रज्ञान व्हिडिओचे प्रसारण करण्यात आले .विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, कोल्हापूर व नाशिक कृषि विभागांचे कृषि सह-संचालक  रफिक नाईकवाडी,  बसवराज बिराजदार व  मोहन वाघ यांनी त्यांच्या विभागांचा अहवाल सादर केला. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या सर्व दहा जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल सादर केला. बैठकीदरम्यान डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. नंदकुमार  कुटे, डॉ योगेश बन यांनी अनुक्रमे ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे मानके, खरीप सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान, तूर लागवड तंत्रज्ञान  आणि  नाचणी व तत्सम तृणधान्य पिके  सुधारित लागवड तंत्रज्ञान  याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी कृषि अधिकारी व शास्त्रज्ञ यांचा कृषि तंत्रज्ञान प्रत्याभरण यावर सुसंवाद झाला. 
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. रविंद्र बनसोड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोहन शेटे यांनी तर आभार  डॉ. डी.बी. लाड यांनी मानले. या बैठकीस विद्यापीठाचे कुलसचिव  विठ्ठल शिर्के, सहयोगी अधिष्ठाता, कृषि सह-संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उप-विभागीय कृषि अधिकारी, विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार