कडधान्य संशोधक केंद्राने विकसित केलेले बियाने अव्वल-डाॅ कूटे

कडधान्य संशोधन केंद्राने विकसित केलेले वाण देशात अव्वलस्थानी
- प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या कडधान्य संशोधन केंद्राने विकसित केलेले हरभरा, तुर, मुग, उडीद व चवळी या कडधान्ये पिकांचे वाण उत्पन्न व उत्पादनामध्ये देशात अव्वल स्थानी असून ते सर्वांच्याच पसंतीस देखील उतरलेले आहेत असे प्रतिपादन कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी गुंडेगाव, ता. नगर येथील शेतकर्यांना मार्गदर्शन करताना केले. कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या वतीने खरीप 2023 या हंगामामध्ये राहुरी, नगर, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यातील  तुर उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर तुरीची आणि तुर व सोयाबीन या पिकांची आंतरपीक म्हणून आद्यरेखा प्रात्यक्षिके राबविण्यात आलेली आहेत. या आद्यरेखा प्रात्यक्षिकांची पाहणी करून शेतकर्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कुटे हे बोलत होते.
यावेळी किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ यांनी तूर, मुग व उडीद या पिकांवर प्रादुर्भाव झालेल्या किडींचे सर्व्हेक्षण करुन शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. चांगदेव वायळ म्हणाले की चालू वर्ष हे एकमेव असे वर्ष आहे की मागील सलग एक ते सव्वा महिना पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिकांची समाधानकारक वाढ झालेली नाही. असे जरी असले तरी पण किडींच्या प्रजननासाठी आणि वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतांना दिसून येत आहे. अशा वेळी शेतकरी बांधवांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 5.0 मिली/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर, मुग व उडीद या पिकावरील अळीवर्गीय किडींनी आर्थिक नुकसानकारक पातळी ओलांडल्यास क्विनालफॉस 25 ई.सी. 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 एस.सी. 7 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 एस. सी. 4 ग्रॅम किंवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस.सी. 4 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यातून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी करावी. तुरीवरील वांझ रोगाच्या नियंत्रणासाठी एरिओफाईड माईट या कोळी कीटकाचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. एरिओफाईड माईट या कोळीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 50 मि.ली. किंवा सल्फर 80 डब्ल्यू.डी.जी. 25 ग्रॅम किंवा फेनाझाक्विन 10 ई.सी. 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
याप्रसंगी रोगशास्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी तुर, मुग व उडीद या पिकांवरील रोगांचे सर्व्हेक्षण करुन त्यांच्या नियंत्रणाबाबतच्या उपाययोजना संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी श्री. नारायण कारंडे यांनी कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनांसंदर्भात शेतकर्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी गुंडेगावचे कृषि सहायक, ज्ञानेश्वर पांडुळे, राळेगणचे कृषि सहायक, अजयकुमार लांडगे, गुंडेगावचे प्रगतशील शेतकरी बाजीराव चौधरी, नामदेव चौधरी, सुरेश जाधव, सुहास हराळ, तुकाराम चौधरी, सर्जेराव चौधरी व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार