प्रसारीत तंत्रज्ञान उपयोग उत्पन्न भारी डाॅ नंदकुमार कुटे

प्रसारीत तंत्रज्ञानाचा  अवलंब केल्यास तुरीचे उत्पन्न दिडपट
- प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे

कृषी विद्यापीठांनी विकसीत केलेल्या तुरीच्या सुधारीत वाणांचा व शिफारशींचा अवलंब करुन तूर पिकाचे व्यवस्थापन केल्यास तुरीचे उत्पन्न दिडपट वाढते असे प्रतिपादन कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाच्या वतीने कुंभारगाव, ता. करमाळा येथे आयोजीत करण्यात आलेल्या शिवार फेरी व शेतकरी मेळावा कार्यक्रमात डॉ. नंदकुमार कुटे बोलत होते. यावेळी तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ, रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी  देविदास चौधरी, सत्यवान देशमुख, कुंभारगांव अ‍ॅग्रोचे निमंत्रक  महेंद्र देशमुख व प्रगतशिल शेतकरी  गणेश धुमाळ उपस्थित होते. 
यावेळी डॉ. कुटे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, तुरीची लागवड वाढावी व तूरीचे उत्पन्न वाढावे म्हणून कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीचे शास्त्रज्ञ जमिनीची व बियाणांची निवड, बिजप्रकिया, खत, पाणी, तण व सुक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन याचबरोबर किडी व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन या संदर्भात आकाशवाणी व दुरदर्शनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वृत्तमानपत्रातील व मासिकांमधील लेखांमधून त्याचप्रमाणे चर्चासत्रे, शिवारफेरी व शेतकरी मेळाव्यांमधून वेळोवेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत असतात. या हंगामात अशाच स्वरुपाचे मार्गदर्शन कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीतील शास्त्रज्ञांनी कुंभारगाव, ता.करमाळा येथील शेतक-यांना वेळोवेळी केलेले आहे. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानूसारच कुंभारगाव येथील शेतकर्‍यांनी शिफारशीचे तंतोतंत पालन व तूर पिकाचे व्यवस्थापन केल्यामुळे या वर्षी कुंभारगाव येथील तूर उत्पादक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दिडपट वाढ होईल असा विश्वास डॉ कुटे यांनी व्यक्त केला. 
तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ यांनी सांगितले की, तूर या पिकावर 250 पेक्षा जास्त किडींचा प्रादुर्भाव होत असल्याची नोंद आढळून आलेली आहे आणि आपण जर वेळीच या किडींचे नियंत्रण करु शकलो नाही तर, मात्र 30 ते 40 टक्यापेक्षा जास्त उत्पन्नात घट ही केवळ तुरीवरील किडींच्या प्रादुर्भावामुळे होत असते. परंतु कुंभारगाव, ता. करमाळा येथिल तूर उत्पादक शेतकर्‍यांनी जागजाग वारीची लागवड, चिकट सापळे, कामगंध सापळे,पक्षी थांबे,5 टक्के निंबोळी अर्क आणि एचएएनपीव्हिची फवारणी या सुत्रीचा प्रभावीपणे अवलंब केल्यामुळे आणि कुठलेही रासायनिक किडनाशक न फवारता देखील किडींचे अत्यंत चांगल्याप्रकारे व्यवस्थापन व नियंत्रण केल्यामुळे येथिल शेतकर्‍यांना एकरी 14 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकेल. कुंभारगाव येथील शेतकर्‍यांनी या पध्दतीने तुरीवरील किडींचे प्रभावीपणे व्यवस्थापन व नियंत्रण केलेले आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि या शेतकर्‍यांचा इतर शेतकर्‍यांनी आदर्श घ्यावा असे डॉ. वायळ म्हणाले.
यावेळी तुरीचे रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी सांगितले की, तुरीवर 10 पेक्षा जास्त रोगांचा प्रादुर्भाव होत असून यापैकी वांझ रोग व मर रोग या दोन रोगांमुळेच तुरीचे मोठया प्रमाणात नुकसान होत असते. या रोगांच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया करावी, पिकांची फेरपालट करावी तसेच तुरीचा खोडवा ठेवू नये. यावेळी मंडळ कृषी अधिकारी देविदास चौधरी व सत्यवान देशमुख यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाची प्रस्तावना कुंभारगांव अ‍ॅग्रोचे निमंत्रक श्री. महेंद्र देशमुख यांनी केली तर आभार प्रगतशिल शेतकरी  गणेश धुमाळ यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सत्यम झिंजाडे, मुबारक शेख,  रेणुका चौधरी,  प्रियंका देशमुख, कल्याणी टेंभरे, सुवर्णा टेंभरे,सारीका सायकर, रुक्साना शेख, संघर्ष महिला शेतकरी गट, कोर्टी च्या महिला शेतकरी आणि  शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार