देशी गाई व प्रशिक्षण केंद्र-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हह्ते भूमिपूजन

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न

राहुरी -
भारत हा पशुपालकांचा देश आहे व मी स्वतः देखील एक शेतकरी असून शेतीमध्ये तसेच डेअरी व पोल्ट्री सारख्या शेतीपूरक उद्योगांमध्ये काम केले आहे. दुग्ध व्यवसायाची सुरुवात करताना सुरुवातीच्या काळात देशी गाईंच्या ऐवजी संकरित गाई आणल्या होत्या. तथापि, गोपालन करताना असे निदर्शनास आले की संकरित गायीची तुलना देशी गाई बरोबर होऊच शकत नाही. पूर्वजांनी जतन केलेल्या व लुप्त होत असलेल्या देशी गाईंचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. भारतासारख्या खंडप्राय देशांमध्ये अनेक प्रकारच्या देशी गाई आहेत. नुकतीच विदर्भामध्ये कथनी या गाईच्या देशी गोवंशास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने मान्यता दिली आहे. देशी गाईचे तूप खूप आरोग्यदायी आहे. देशी गायीचे मानवी आरोग्यातील व जीवनातील महत्त्व लक्षात घेता नुकतेच राज्य शासनाने देशी गाईस राज्यमाता - गोमाता हा दर्जा बहाल केला आहे, ज्याचा देशी गाईंच्या संवर्धनासाठी मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 50 पेक्षा अधिक गाई असणार्या गोशाळांना प्रती गाय प्रति दिन रुपये 50 इतके अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने देशी गाईंच्या संशोधनामध्ये केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. यामध्ये त्यांनी देशांमध्ये दुधासाठी प्रसिद्ध असणार्या विविध जातींच्या गाई एकत्र आणून त्यांच्यावर अनेक प्रकारचे संशोधन सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत गाईंचे केवळ दूधच नव्हे तर शेण व गोमूत्रावर प्रक्रिया करून विविध प्रक्रिया युक्त पदार्थ निर्माण करून त्यांच्या मार्फत पशुपालन अधिक फायदेशीर करून दाखविले आहे. भ्रूण प्रत्यारोपण, लिंग निर्धारित वीर्यमात्रांचा वापर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत केवळ विद्यापीठाच्याच नाही तर शेतकर्यांच्या शेतावर देखील जातिवंत कालवडी या संशोधन केंद्राने तयार केल्या आहेत. या सर्व प्रयत्नातून देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने शाश्वत देशी गोपालनाचे मॉडेल विकसित केले आहे.
 या केंद्राच्या बळकटीकरणातून शहरी लोकांना देशी गाईंचे महत्त्व समजेल, अंशमुक्त दूध उत्पादन निर्माण करणे शक्य होईल. या प्रकल्पामुळे देशी गो संवर्धनासाठी परंपरेला आधुनिकतेची जोड देणे अरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सेंटर ऑफ एक्सलन्स चे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभ हस्ते पुणे कृषि महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात संपन्न झाले. यानिमित्ताने नवीन अवजारे शेड याचे भूमिपूजन व नूतनीकरण केलेला मुक्त संचार गोठा व नवीन पर्यावरण नियंत्रित गोठ्याचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. याप्रसंगी राज्याच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष श्री. तुषार पवार, कृषि परिषदेचे महासंचालक  रावसाहेब भागडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, विद्यापीठ अभियंता  मिलिंद ढोके, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व या प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कंखरे उपस्थित होते. 
याप्रसंगी अजित पवार बोलतांना पुढे म्हणाले की मी नेहमीच चांगल्या कामाच्या पाठीशी असतो. या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी देशी गाय संवर्धनासाठी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. या केंद्राच्या बळकटीकरणासाठी 71 कोटींच्या भरीव निधीची तरतूद केली असून या निधीच्या आधारे या केंद्रामध्ये अत्यंत आधुनिक व जागतिक दर्जाची देशी गाईंची गोशाळा उभी करून तिथे संशोधन व आधुनिक पशुधन व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करणे शक्य होईल. हा प्रकल्प म्हणजे परंपरेला दिलेली आधुनिकतेची जोड ठरेल. जिथे एखाद्या पिकाचा नवीन वाण विकसित करायला पाच ते सात वर्षांचा कालावधी लागतो, तिथेच एखादी शुद्ध गोवंशाची गाय मिळविण्यासाठी 25 ते 30 वर्षांचा कालावधी जातो. त्या कामाची या संशोधन केंद्राने सुरुवात केली असून या केंद्रातून शेतकर्यांना शुद्ध जातिवंत गोवंशाची जनावरे उपलब्ध होतील ही अपेक्षा आहे. कृषि पर्यटन केंद्र ही बाब सर्वांना परिचित आहे, परंतु या केंद्रामध्ये देशातील पहिले गो पर्यटन केंद्र सुरु करणार आहेत, ही अतिशय नवीन व चांगली संकल्पना असून अशा प्रकल्पांना गरज पडेल तेव्हा मदत करण्यास, पाठीशी उभा राहण्यास मी नेहमी तत्पर असतो असेही ते या प्रसंगी म्हणाले. नवरात्रीच्या पावनपर्वामध्ये या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सेंटर ऑफ एक्सलन्स चे भूमिपूजन करणे हा एक शुभ संकेत असून उपस्थित विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांकडून चांगले ज्ञान घेत दर्जेदार काम उभे करून देशाचे भवितव्य उज्वल करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी श्री. शेखर मुंदडा यांनी सांगितले की गोसेवा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून महाराष्ट्रापाठोपाठ देशातील 10 राज्यात गोसेवा आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. परंतु देशी गोवंशाकरता काम करणारा महाराष्ट्र राज्यातील गोसेवा आयोग हा एकमेव आयोग असून महाराष्ट्रात सुरू असलेले देशी गोवंश संवर्धनाचे काम उल्लेखनीय आहे. देशी गाईंच्या संवर्धनाबाबतीत सरकारवर निर्भर राहण्यापेक्षा स्वतंत्र व्यवस्था निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.  गोसेवा आयोग स्थापन होऊन त्याच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर सर्वप्रथम राज्यभरातील 5000 पेक्षा अधिक गोशाळांना भेटी देऊन त्याच्या आधारे देशी गाय संवर्धनासाठी जी-10 व्हिजन डॉक्युमेंट प्रस्तावित केले आहे. या मध्ये प्रामुख्याने गो संवर्धन, गो संशोधन, गो संरक्षण, गो सेवा, गोमय प्रक्रिया, गो मूल्यवर्धन, गोशाळा, गो शेती, गो टुरिझम, गो साक्षरता असे उपक्रम राबविले जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे गो पर्यटन (काऊ टुरिझम) केंद्र सुरू करण्यास आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. या केंद्राच्या साह्याने राज्यातील गोशाळा स्वयंपूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होत असल्याचे ते म्हणाले. 
यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त व नियोजन मा. ना. श्री. अजित पवार यांनी केलेल्या रुपये 71 कोटींच्या निधीच्या भरघोस तरतुदीबाबत आभार व्यक्त केले.  याप्रसंगी त्यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व राज्याच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष  शेखर मुंदडा यांचे देखील आभार व्यक्त केले. या संशोधन केंद्रामध्ये देशी गायी वरील संशोधनाची सुरुवात साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्र च्या स्थापनेनंतर खर्या अर्थाने झाली. सन 2016 मध्ये येथील शास्त्रज्ञांनी साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्रची 7 गायींपासून सुरुवात केली होती ज्या मध्ये आजमितीस 7000 पेक्षा अधिक साहिवाल गायी आहेत. मा. अजित पवार यांनी सन 2020 मध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यासाठी रुपये दोन कोटींची मदत केली होती जिच्याद्वारे देशांमध्ये दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असणार्या साहिवाल, गीर, लाल सिंधी, थारपारकर व राठी या पाचही गोवंशांची जातिवंत, शुद्ध रक्ताची गुरे हुडकून त्यांना भारत पाकिस्तान सीमा, राजस्थान, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश अशा दुर्गम ठिकाणाहून प्राप्त केले गेले. देशामध्ये दुधासाठी प्रसिद्ध असणारे हे पाचही गोवंश एकाच ठिकाणी पाहता येतील असे हे देशातील एकमेव ठिकाण असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील गोवंशांच्या बरोबरीनेच या केंद्रामध्ये महाराष्ट्रातील खिलार, देवणी, लाल कंधारी, गौळाऊ, डांगी व कोकण कपिला या गाईंच्या जाती व आंध्र प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण पंगूनूर गाय देखील अभिमानाने जोपासली जात असल्याचे सांगितले. या संशोधन केंद्रामध्ये देशातील पहिल्या पर्यावरण नियंत्रित गोठ्याची उभारणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.  फिनोलेक्स कंपनी व त्या कंपनीच्या मुकुल माधव फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून देखील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील अनेक पायाभूत सोयी सुविधांचे नूतनीकरण करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो व एका ध्येयाने कार्य केले तर यश निश्चित मिळते, त्यासाठी सकारात्मक विचाराने कार्य करत रहावे असे आवाहन मा. कुलगुरू महोदयांनी केले.
यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के यांनी सन 2007 मध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठास केंद्र शासनाने 100 कोटींची मदत केली होती व त्यानंतर केवळ एकाच विभागास 71 कोटी रुपयांची भरीव मदत मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे नमूद केले. डॉ. महानंद माने यांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे परिसरात व गो परिक्रमा केल्यानंतर माणसाच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते असे सांगितले. असा फायदा मिळवण्यासाठी प्रत्येकाने आठवड्यातील किमान एक तास देशी गाईंच्या सानिध्यात व्यतीत करावा असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. धीरज कंखरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार