बेशिस्त डम्पर मुळे आपघात वाढ

राहुरी फॅक्टरी–कणगर रस्त्यावर खडी डम्परमुळे अपघात वाढले
राहुरी।प्रतिनिधी 
नगर–मनमाड राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी चौक सध्या अपघातप्रवण मार्ग बनला आहे. मात्र, या गंभीर समस्येबाबत कोणीही बोलायला तयार नाही. बेशिस्त वाहतुकीला शिस्त कोण लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना हप्त्या पोटी रस्त्यावर लोक तडफडून मरत आहेत. बेशरम प्रशासनाला मात्र याचे काहीच सोयरसुतक नाही.
सध्या कणगर खडी क्रशरवरून भरगच्च खडी भरलेले डम्पर भरधाव वेगात बेसुमार धावत असून, राहुरी फॅक्टरी चौक व ताराबाद चौफुली परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
डम्पर चालकांसाठी काही नियम आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. महसूल विभाग, आरटीओ व पोलीस प्रशासन सगळेच जणू मूग गिळून गप्प आहेत. लोक मरत असताना प्रशासन झोपेचे सोंग घेऊन सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
या रस्त्यावर शाळेच्या बसेस, स्थानिक वाहने, अतिक्रमण यामुळे आधीच वाहतूक कोंडी होते. त्यात निवडणुकीचे बॅनर्स परिस्थिती अधिकच अडचणीची करत आहेत.
डम्पर चालकांना पायी चालणारे प्रवासी दिसत नाहीत काय? नियमाप्रमाणे किमान वेगमर्यादा पाळणे व डम्परला एक साथीदार (क्लीनर) असणे आवश्यक असताना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
बेशिस्त वाहतुकीला वेळीच आळा घातला नाही, तर स्थानिक नागरिकांना कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे. लटकू प्रकरणासारखीच परिस्थिती डम्परबाबत निर्माण होईल, तेव्हाच शिस्त लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
डम्पर वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवणे गरजेचे असून, त्यासाठी मर्यादित खडी वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. सध्या केवळ खडीच नव्हे तर मुरूम व वाळूचीही दिवसा ढवळ्या वाहतूक सुरू आहे. “अडाळ दळते आणि कुत्रे पीठ खातात” अशी अवस्था सध्या राहुरी फॅक्टरी परिसरात झाली आहे.
संपूर्ण रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीला आळा घालणे अत्यंत गरजेचे असताना, “मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, बेशिस्त वाहतुकीवर आरटीओ कारवाई कधी करणार, महसूल विभाग नियम कधी दाखवणार आणि नगरपालिकेने केव्हा जागृत व्हायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ज्याला जसे वाटेल तसे सध्या सर्व काही सुरू असून, लोक जगले पाहिजेत याची प्रशासनाने दखल घ्यावी. अन्यथा नागरिक कायदा हातात घेतील. फक्त श्रीमंतीचा फायदा न पाहता, पायी चालणाऱ्या सामान्य नागरिकांनाही रस्त्यावर सुरक्षितपणे वावरण्याचा अधिकार आहे, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर