भोगू कॅप्टन अशोक खरात चे शारीरिक व सामाजिक वजन घटले
भोगू कॅप्टन अशोक खरात चे शारीरिक व सामाजिक
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे
एकेकाळी ‘अवतारी पुरुष’ म्हणून डोक्यावर घेतले गेलेला अशोक खरात आज कारागृहात बसून जामिनाची वाट पाहत आहेत
ही केवळ एका व्यक्तीची घसरण नाही; तर अंधश्रद्धा, आंधळा विश्वास आणि प्रभावशाली जाळ्याच्या बळावर उभ्या राहिलेल्या बनावट अध्यात्मिक बाजारपेठेचा पर्दाफाश आहे.
ज्यांनी स्वतःला चमत्कारांचा केंद्रबिंदू म्हणून मांडले, तोच आज कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे, हीच या प्रकरणाची सर्वात मोठी विडंबना ठरते.
स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या अशोक खरात यांची तब्येत आणि प्रतिमा—दोन्हीही सध्या मोठ्या दबावाखाली असल्याचे चित्र समोर येत आहे. एकेकाळी राजकारणी, मोठे व्यावसायिक, उच्च अधिकारी तसेच प्रतिष्ठित भक्तगण यांच्यात वावर असलेले खरात यांनी उभारलेले कथित ‘आध्यात्मिक साम्राज्य’ भक्कम मानले जात होते. त्या बळावर ‘अवतारी पुरुष’ अशी प्रतिमा तयार करत त्यांनी प्रभाव निर्माण केला होता; मात्र आता त्याच प्रतिमेला तडा गेल्याचे दिसत आहे.
माहितीनुसार, अटकेनंतर खरात यांचे सुमारे ७ किलो वजन घटले आहे. एका बाजूला एसआयटीकडून होत असलेली सखोल चौकशी, प्रश्नांची सरबत्ती; तर दुसऱ्या बाजूला आरोग्याशी संबंधित अडचणी—या दुहेरी दबावामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची चर्चा आहे. पूर्वी विविध आजारांवर स्वतः ‘उपचार’ देण्याचा दावा करणारे खरात उच्च रक्तदाब, मधुमेह, भगंदर, बद्धकोष्ठता, पॅरॅलिसिस अशा अनेक आजारांवर गोळ्यांचे ‘डोस’ घेत असल्याचे सांगितले जाते. लोकांना औषधे, मध इत्यादी देत उपचार केल्याचे दावे करणारे खरात आता स्वतःच औषधांच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे.
चौकशीदरम्यान त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा कॉल डेटा समोर येत असून, त्यांच्या जाळ्याची व्याप्ती तपासली जात आहे. एकेकाळी प्रभावाने ‘खुर्च्या हलवणारे’ खरात आज मात्र कारागृहातच अडकले आहेत. सध्या त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, सुरक्षा कारणास्तव त्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जात आहे. बाहेर त्यांच्या जीवितास धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊनच
खरात यांची ‘यशोगाथा’ पाहिली, तर ती प्रत्यक्षात समाजाच्या कमकुवतपणाची कहाणी आहे. आजार, संकटे, वैयक्तिक अडचणी यांवर झटपट उपाय मिळावा, या मानसिकतेचा गैरफायदा घेत ‘भोगू कॅप्टन’सारख्या स्वयंघोषित गुरूंनी आपले एवढे मोठे साम्राज्य उभे केले. औषधांच्या नावाखाली गोळ्या, मध, तांत्रिक विधी—या सगळ्याचा आधार घेत लोकांच्या भावनांशी खेळ करण्यात आला. विज्ञान आणि वैद्यकशास्त्रावर विश्वास ठेवण्याऐवजी चमत्कारांवर विसंबून राहण्याची प्रवृत्तीच अशा लोकांना खतपाणी घालते.
या प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे प्रभावशाली व्यक्तींचा कथित सहभाग. राजकारणी, अधिकारी, व्यावसायिक यांच्या संपर्कामुळेच अशा ढोंगी व्यक्तींना संरक्षण मिळते, अशी शंका जनमानसात निर्माण होते. जर समाजातील ‘वरचे’ लोकच अशा प्रकारांना थारा देत असतील, तर सामान्य माणसाने कुणावर विश्वास ठेवायचा? हा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येतो.
आज अशोक खरात यांचे वजन घटल्याच्या बातम्या येत आहेत; पण प्रत्यक्षात घटले आहे ते त्यांच्या ‘प्रतिष्ठेचे वजन’. एकेकाळी ज्यांच्या शब्दावर लोक डोळेझाक करून विश्वास ठेवत होते, त्याच व्यक्तीवर आज गंभीर आरोपांची मालिका आहे. एसआयटीची चौकशी, कॉल डेटा, आर्थिक व्यवहारांची उकल—या सगळ्यामुळे तयार केलेले ‘दैवी आवरण’ पूर्णपणे फाटले आहे.
महिलांच्या शोषणाच्या आरोपांनी या प्रकरणाला आणखी गंभीर वळण दिले आहे. जर एखादा ‘गुरू’ आपल्या प्रभावाचा वापर करून असहायतेचा गैरफायदा घेत असेल, तर तो केवळ गुन्हेगार नाही; तर समाजासाठी घातक प्रवृत्ती आहे. त्यामुळेच काही संघटनांनी नार्को चाचणीसारख्या कठोर मागण्या पुढे केल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणातून सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे—अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक श्रद्धा नसून, ती सामाजिक धोका ठरू शकते. ‘चमत्कार’ आणि ‘अवतार’ या संकल्पनांच्या आहारी जाऊन आपण स्वतःचे विवेकबुद्धी गमावत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
कायद्याचा डोस उशिरा का होईना, पण लागलाच—हे या प्रकरणातून स्पष्ट झाले. आता अपेक्षा एकच—तपास निष्पक्ष आणि सखोल व्हावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा प्रकारांना आश्रय देणाऱ्या साखळीदेखील उघड व्हावी.
कारण शेवटी, समाज जागा झाला नाही, तर ‘भोगू कॅप्टन’ बदलतील—पण ‘भोगण्याची’ वेळ मात्र पुन्हा पुन्हा समाजावरच येत राहील.
Comments
Post a Comment