महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षक झाले आता डी वाय एस पी
महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षकांना डीवायएसपी पदावर पदोन्नती; राहुरीचे माजी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनाही बढती
घाडगे न्यूज @प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून राज्यातील तब्बल २४७ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदलीचे आदेशही जाहीर करण्यात आले आहेत.
या पदोन्नती यादीमध्ये राहुरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले प्रमोद सदाशिव वाघ यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवाकाळाची दखल घेत त्यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती देण्यात आली असून मुक्ताईनगर येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रमोद वाघ यांनी राहुरीसह विविध ठिकाणी पोलीस दलात जबाबदारीची पदे सांभाळताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे तसेच जनसामान्यांशी सुसंवाद ठेवणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच राहुरी परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. वरिष्ठतेनुसार पदोन्नती मिळण्याची प्रतीक्षा अनेक अधिकारी करत होते. अखेर शासनाने मोठा निर्णय घेत २४७ अधिकाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती दिल्याने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment