आपत्कालीन स्थितीत हॅम चे महत्त्व
अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, अशा वेळी प्रभावी संपर्क व्यवस्था किती महत्त्वाची ठरते याबाबत जनजागृती करण्यासाठी शिर्डी अमॅच्युअर रेडिओ क्लबच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांना नगर येथील चांदबीबी महाल परिसरात हॅम रेडिओबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात हॅम रेडिओची कार्यपद्धती, आपत्कालीन काळात त्याची उपयुक्तता, तसेच पारंपरिक संप्रेषण व्यवस्था खंडित झाल्यास हॅम रेडिओ कसा प्रभावी पर्याय ठरतो, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती किंवा अन्य संकटांच्या वेळी हॅम रेडिओद्वारे जलद आणि विश्वासार्ह संवाद साधता येतो, हे विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले.
यावेळी शिर्डी अमॅच्युअर रेडिओ क्लबचे अध्यक्ष परशुराम कुटे, सदस्य तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, तसेच राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत हॅम रेडिओ क्षेत्रातील संधी आणि त्याचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “यशस्वी जीवनासाठी सतत नवे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून, हॅम रेडिओसारख्या तांत्रिक क्षेत्रातही आवड निर्माण करून कौशल्य विकसित करावे,” असे आवाहन करण्यात आले.
Comments
Post a Comment