कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कापूस उत्पादक शेतकर्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन
राहुरी।
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांतर्गत  कोंढवड येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या कापूस उत्पादक शेतकर्यांना विद्यापीठ शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, उद्यानविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सार अत्तार आणि दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे उपस्थित होते. याप्रसंगी कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे, सहायक कृषि अधिकारी भारती ढगे, दुर्गा शहाणे उपस्थित होते. यावेळी डॉ. खर्डे यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे उद्दिष्टे विषद केली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मंचामार्फत शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कापूस उत्पादक शेतकरी शंकर म्हसे, अशोक म्हसे, तानाजी नेहे, संभाजी पेरणे, संदीप म्हसे, दीपक म्हसे, गोरक्षनाथ म्हसे यांच्या कपाशी क्षेत्रास शास्त्रज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. कीटकशास्त्रज्ञ डॉ. भुते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की पीक लागवडीनंतर 45 दिवसांनी झाडाखालची गळ फांदी काढून टाकावी तसेच पीक 75 ते 80 दिवसांचे झाल्यावर अथवा साडेतीन ते चार फूट उंचीचे झाल्यावर त्याची शेंडी खुडावीत जेणेकरून उत्पादनात वाढ होते. यावेळी त्यांनी खत व्यवस्थापन तसेच कीड व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकर्यांना विद्यापीठ निर्मित फुले सुपर बायोमिक्स तसेच फुले ग्रेड सूक्ष्म अन्नद्रव्य याचे महत्त्व सांगितले. किड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा आणि चिकट सापळ्यांचा वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. घन लागवड पद्धतीमध्ये झाडांची संख्या वाढवून उत्पादनात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी-शास्त्रज्ञांच्या गट चर्चेमध्ये शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या आणि कृषि विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ कोंढवड ग्रामस्थत कापूस उत्पादकांना झाला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन