लोकमान्य टिळक पुण्यतिथी माझ्या भाषणाची पहिली सुरुवात
लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिनी माझ्या पहिल्या भाषणाचा जन्म
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने माझ्या वक्तृत्वाची, लेखणीचा आणि जीवन प्रवासाची सुरवात झाली
दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस देशभरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या आदराने साजरा केला जातो. अनेकांसाठी हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या एका महानायकाला अभिवादन करण्याचा असतो; पण माझ्यासाठी या दिवसाचे महत्त्व त्यापेक्षाही अधिक आहे. कारण हा दिवस माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ करणारा दिवस आहे. आजपासून तब्बल ३५ वर्षांपूर्वी, शालेय जीवनात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त केलेले माझे पहिले भाषण हेच माझ्या वक्तृत्वाचा जन्म ठरले. त्या दिवशी मिळालेल्या टाळ्यांचा कडकडाट आजही माझ्या कानात घुमतो आणि त्या टाळ्यांनीच माझ्यातील वक्ता, लेखक आणि पत्रकार घडविण्याची प्रक्रिया सुरू केली
त्या वेळी मी छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला व्यासपीठावर उभे राहण्याची भीती वाटली नाही स्वतःवर विश्वास होता. मात्र माझे मराठी विषयाचे शिक्षक अरुण कराड सर यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. "तू भाषण कर, तू नक्की चांगले बोलशील," असा आत्मविश्वास त्यांनी माझ्या मनात निर्माण केला. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी स्पर्धेत सहभागी झालो. त्या स्पर्धेत मला तिसरा क्रमांक मिळाला. पाहता पाहता तो तिसरा क्रमांक माझ्या आयुष्याचा पहिला मोठा विजय ठरला. कारण त्या एका भाषणाने माझ्या आयुष्याला दिशा मिळाली.
त्या भाषणाची तयारी करण्यासाठी मला लोकमान्य टिळक यांच्यावरील पुस्तके वाचावी लागली. त्या वेळी आमच्या शाळेतील दिवंगत ग्रंथपाल काशिनाथ रसाळ यांनी मला अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली. त्यांनी माझ्या हातात दिलेली ती पुस्तके आजही माझ्या स्मरणात आहेत. त्या पुस्तकांची किंमत कदाचित काही रुपये असेल; पण त्या पुस्तकांनी मला आयुष्यभराची अमूल्य संपत्ती दिली. ज्ञान, विचार, अभ्यास आणि आत्मविश्वास या चार गोष्टी त्या पुस्तकांनी मला दिल्या. म्हणूनच मी आजही ठामपणे सांगतो मी पुस्तके वाचली नाहीत; पुस्तकांनीच मला घडवले.
वाचनातून विचार समृद्ध झाले. विचारांतून भाषण घडले आणि भाषणातून लेखनाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर वक्तृत्व माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले. पुढे माध्यम क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. गेली तीन दशके पत्रकार म्हणून काम करताना हजारो बातम्या, शेकडो लेख, असंख्य संपादकीय आणि सामाजिक विषयांवरील विविध लेखमाला लिहिण्याची संधी लाभली. पत्रकारिता माझ्यासाठी केवळ व्यवसाय राहिली नाही, तर समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनली.
सार्वजनिक जीवनात, सामाजिक चळवळींमध्ये, ग्रंथालय आंदोलनात आणि विविध व्यासपीठांवर बोलताना शालेय जीवनात मिळालेला तो पहिला आत्मविश्वास सतत माझ्या पाठीशी उभा राहिला. व्यासपीठ बदलत गेले, श्रोते बदलत गेले, विषय बदलत गेले; पण भाषणामागील प्रामाणिकपणा, अभ्यास आणि राष्ट्रहिताची भावना कधीही बदलली नाही.
माझ्या लेखणीने मला देशभर नेले. जलसंवर्धन आणि जलजागृतीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल भारत सरकारने घेतली आणि राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित केले. त्याचबरोबर 'जलनायक' ही पदवी बहाल करण्यात आली. हा सन्मान माझ्यासाठी केवळ वैयक्तिक नव्हता, तर समाजासाठी केलेल्या कार्याची पोचपावती होती.
शेतकरी हा देशाचा कणा आहे, या भावनेतून कृषी विषयावर सातत्याने लेखन केले. आधुनिक शेती, जलव्यवस्थापन, पीकपद्धती, शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केलेल्या लेखनामुळे महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषीमित्र पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार माझ्या लेखणीने ग्रामीण भागाशी जपलेल्या नात्याचा सन्मान होता.
ग्रंथालय चळवळीशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. समाजात वाचन संस्कृती वाढावी, प्रत्येक गावात ग्रंथालय सक्षम व्हावे आणि युवकांनी पुस्तकांशी मैत्री करावी, यासाठी सातत्याने काम केले. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्काराने गौरव केला. हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले ते माझे शाळेतील ग्रंथपाल काशिनाथ रसाळ. त्यांनी हातात दिलेली पुस्तके नसती, तर कदाचित हा पुरस्कारही मिळाला नसता.
समाजात सलोखा निर्माण व्हावा, गावोगावी तंटे मिटावेत आणि शांततेचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त अभियानावर सातत्याने लेखन केले. त्या लेखनामुळे सलग तीन वर्षे महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार प्राप्त झाले. या पुरस्कारांनी लेखणीची सामाजिक जबाबदारी अधिक वाढवली.
आज मागे वळून पाहताना जाणवते की, या सर्व यशामागे, पुरस्कारांमागे आणि सन्मानांमागे एकच पाया आहे तो म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त केलेले माझे पहिले भाषण त्या दिवशी मी फक्त काही मिनिटे बोललो होतो; पण त्या काही मिनिटांनी माझ्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकला.
आजही मला माझे शिक्षक अरुण कराड सर आठवतात. भाषणानंतर त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत सांगितले होते, "तू पुढे फार मोठा माणूस होशील." त्या शब्दांनी माझ्या मनात केवळ यशाची नव्हे, तर प्रामाणिकपणाची आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा निर्माण केली. आजही त्यांच्या त्या शब्दांची सावली माझ्या प्रत्येक निर्णयामागे उभी असते.
लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" अशी सिंहगर्जना केली. त्यांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली. माझ्यासारख्या एका विद्यार्थ्यालाही त्यांनी अप्रत्यक्षपणे घडवले. त्यांच्या निमित्त झालेल्या भाषण स्पर्धेने माझ्या आयुष्याचा पाया घातला. म्हणूनच माझ्यासाठी लोकमान्य टिळक हे केवळ इतिहासातील महापुरुष नाहीत, तर माझ्या व्यक्तिमत्त्वाचे शिल्पकार आहेत.
मोठे होण्यासाठी महागडी साधने लागत नाहीत. एक चांगले पुस्तक, एक प्रेरणादायी शिक्षक, एक ग्रंथपाल आणि स्वतःवर विश्वास ठेवणारा एक क्षण पुरेसा असतो. मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झालेले नाही. कारण माहिती इंटरनेट देऊ शकते; पण विचार केवळ पुस्तके देतात.
माझ्या जीवनात वक्तृत्व आणि लेखन ही दोन चाके आहेत. या दोन चाकांवर माझा सामाजिक, पत्रकारितेचा आणि वैचारिक प्रवास सुरू आहे. या प्रवासात अनेक पुरस्कार मिळाले, अनेक मान-सन्मान लाभले, अनेक व्यासपीठे मिळाली; पण माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार अजूनही तोच आहे शालेय जीवनात लोकमान्य टिळक जयंतीच्या दिवशी मिळालेल्या टाळ्या.
आजही जेव्हा मी व्यासपीठावर उभा राहतो किंवा लेखणी हातात घेतो, तेव्हा त्या पहिल्या भाषणाची आठवण मला नव्याने उभारी देते. प्रत्येक शब्द समाजासाठी असावा, प्रत्येक लेख राष्ट्रहिताचा असावा आणि प्रत्येक विचार माणुसकीचा असावा, ही शिकवण त्या पहिल्या भाषणाने दिली.
म्हणूनच माझा झेंडा तिरंगा आहे, माझे रक्त लाल आहे आणि माझी जात माणुसकी आहे. हीच माझ्या लेखणीची ओळख, माझ्या वक्तृत्वाची ताकद आणि माझ्या आयुष्याची खरी दिशा आहे.
लोकमान्य टिळक जयंती हा माझ्यासाठी केवळ स्मरणाचा दिवस नाही; तो माझ्या व्यक्तिमत्त्वाचा, माझ्या वक्तृत्वाचा, माझ्या लेखणीचा आणि माझ्या सामाजिक बांधिलकीचा जन्मदिन आहे. या दिवसाप्रती मी सदैव ऋणी राहीन. कारण जर त्या दिवशी मी पहिले भाषण केले नसते, तर कदाचित आजचा माझा संपूर्ण जीवनप्रवासच वेगळा असता.
@जलनायक ,पत्रकार शिवाजी घाडगे shivaji ghadge 11@gmail.com
Mo-9890221196
Comments
Post a Comment