महाविकास आघाडीचा घोळ की राजकीय पेच नगराध्यक्ष करण ससाणे लढतील

महाविकास आघाडीचा घोळ की राजकीय पेच करण ससाणे लढतील 
राजरंग।शिवाजी घाडगे 
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण दिले आहे. महायुतीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी जवळपास निर्विघ्न ठरत असताना, महाविकास आघाडी मात्र उमेदवारीच्या प्रश्नावर गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. हा केवळ समन्वयाचा अभाव आहे की त्यामागे काही मोठी राजकीय रणनीती दडलेली आहे, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
महाविकास आघाडीने जागावाटप केले, चर्चा केली, संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आली; मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ येताच चित्र पूर्णपणे बदलले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून चर्चा असलेले नगराध्यक्ष करण ससाणे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करतात, जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना ऐनवेळी थांबवले जाते आणि खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीपासून दूर राहतात. या सर्व घटनाक्रमातून महाविकास आघाडीचा समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर येतो.
राजकारणात पराभवापेक्षा चुकीचा संदेश अधिक घातक असतो. या निवडणुकीत महाविकास आघाडीने लढण्यापूर्वीच माघार घेतल्याचा संदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये गेला आहे. जिल्ह्यात सत्ता मिळविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या आघाडीने अधिकृत उमेदवारच उभा करू न शकणे ही गंभीर बाब मानावी लागेल.
दुसरीकडे महायुतीतही सर्व काही सुरळीत असल्याचे म्हणता येणार नाही. प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीवर काही ठिकाणी नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना काही प्रमुख नेत्यांची अनुपस्थितीही राजकीय संकेत देऊन जाते. मात्र महायुतीने किमान निवडणुकीत एकसंघतेचे चित्र उभे करण्यात यश मिळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून जिल्ह्यातील मतभेद नियंत्रणात आणल्याचे दिसते.
या निवडणुकीतील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे करण ससाणे यांची पुढील भूमिका. ते अखेरपर्यंत रिंगणात राहणार का? की एखाद्या राजकीय समझोत्याचा भाग म्हणून माघार घेणार? याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल. 
दुसरीकडे महायुतीतही सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र नाही. भाजपकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर संभाव्य बंडखोरीची चर्चा होती. मात्र सचिन जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ती शक्यता संपुष्टात आली. तरीही तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार संग्राम जगताप किंवा त्यांचे प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत दोन्ही शिवसेना गट फारसे सक्रिय दिसत नाहीत. 
आता सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढविणार की माघार घेणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. भाजपमधील संभाव्य नाराजी, काही स्थानिक समीकरणे तसेच अल्पसंख्याक मतदारांच्या पाठिंब्याच्या आधारावर ते निवडणूक रिंगणात राहतात का, याबाबत उत्सुकता आहे.
राजकीय  सध्याच्या परिस्थितीत ही निवडणूक प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी तुलनेने सोपी मानली जात असली तरी निष्ठावंताना डावल्याचा मुद्दा संध्या भाजपात खदखदतोय 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच जिल्ह्यातील पक्षातील विविध गटांशी संवाद साधून समन्वय साधल्याची चर्चा असून त्याचा परिणाम निवडणुकीवर दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मतदानाच्या दिवशी स्थानिक पातळीवरील नाराजी, क्रॉस व्होटिंग आणि अपक्षांची भूमिका यावर अंतिम निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे.
मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणातील अनेक दडलेली समीकरणे समोर येणार आहेत.
लोकशाहीत निवडणूक म्हणजे केवळ विजय-पराजयाचा खेळ नसतो; ती पक्षांच्या संघटनशक्तीची, नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेची आणि कार्यकर्त्यांवरील पकडीची परीक्षा असते. अहिल्यानगरमधील हा निवडणूकपूर्व घटनाक्रम पाहता महाविकास आघाडीला आत्मपरीक्षणाची गरज आहे, तर महायुतीने विजय निश्चित समजण्याची चूक करू नये. कारण राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तर आकडेमोडीपेक्षा राजकीय रसायनशास्त्र अनेकदा अधिक प्रभावी ठरते.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार