पार्थर्डीत लाचखोर अंमलदार अडकला
पाथर्डीत पाच लाखांची लाच मागणारा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
शहर । प्रतिनिधी
एका हॉटेलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत प्रकरण सौम्य करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. विनोद शिवाजी मासाळकर (वय ३७, पोलीस अंमलदार, बकल नं. २४६७) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. तडजोडीनंतर ठरलेल्या २ लाख १५ हजार रुपयांपैकी एक लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ सप्टेंबर २०२६ रोजी ३७ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या हॉटेलवर काम करणारा कर्मचारी मोटारसायकलवरून पाथर्डी शहरातून जात असताना एका अनोळखी ट्रकचालकाशी गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये मारामारी झाली होती.
या प्रकरणात पोलीस अंमलदार विनोद मासाळकर यांनी तक्रारदाराच्या हॉटेलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध ‘हाफ मर्डर’ आणि रॉबरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारदाराने पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन मासाळकर यांची भेट घेतली.
यावेळी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल न करता वरिष्ठांना सांगून सौम्य स्वरूपाचा मारामारीचा गुन्हा दाखल करण्याचे, तसेच लवकरात लवकर जामीन मिळवून देण्यासह तपासात मदत करण्याचे प्रलोभन दाखवून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची १९ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान पोलीस अंमलदार मासाळकर यांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष तडजोड होऊन २ लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.
त्यानुसार १९ सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. मागणी केलेल्या लाचेच्या रकमेपैकी एक लाख रुपये तक्रारदाराकडे उपलब्ध होते. ही रक्कम पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वीकारताना एसीबी पथकाने मासाळकर यांना ताब्यात घेतले.
आरोपीच्या अंगझडतीत विवो कंपनीचा व्ही ५० मॉडेलचा मोबाईल, १५ हजार १३० रुपये रोख रक्कम आणि एटीएम कार्ड आढळून आले. आरोपीची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असल्याचे एसीबीने कळविले आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दिनेश खैरनार, पोलीस हवालदार अविनाश पवार आणि पोलीस शिपाई योगेश शिंदे यांच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक श्रीमती सविता तांबे करीत आहेत.
कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी, न करण्यासाठी अथवा काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक एसीबीचा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२५७५६२८ असून टोल फ्री क्रमांक १०६४ आहे.
Comments
Post a Comment