जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी सप्ताह निमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजन

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शन
अहिल्यानगर । प्रतिनिधी
जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार योगेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार  नागेश गायकवाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेचे वैभव जपणे, भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख नागरिकांना करून देणे तसेच मराठी भाषेबाबतच्या संशोधनाविषयी जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
या अनुषंगाने जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, इतिहास तसेच विविध विषयांवरील पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या प्रसंगी साहित्यनगरी, पुणेचे संचालक शिवशरद भाबड, गणेश दराडे, किरण पालवे, हरेश्वर सानप, रामदास शिंदे, संतोष कापसे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हे ग्रंथप्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जिल्ह्यातील नागरिक, वाचक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन मराठी साहित्याचा समृद्ध वारसा जाणून घ्यावा आणि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार