उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत राज्यात परिक्षा
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत’ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील युडायस क्रमांक प्राप्त शाळांमध्ये आयोजित या परीक्षेला सुमारे सात लाख असाक्षर व्यक्तींनी सहभाग नोंदविला. या चाचणीत निर्धारित निकषांनुसार उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी केलेल्या असाक्षरांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा नऊ भाषांमधून परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
जीवनोपयोगी कौशल्यांच्या विकासावर भर
केवळ वाचन, लेखन आणि संख्याज्ञानापुरता हा कार्यक्रम मर्यादित नसून नवसाक्षरांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यावरही भर देण्यात आला आहे. आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यविषयक जागरूकता, बालसंगोपन व शिक्षण तसेच कुटुंब कल्याण यांसारखी जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना पुढील शिक्षणासाठी इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणी
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी समाजमाध्यमांद्वारे असाक्षर व्यक्तींना परीक्षेत सहभागी होऊन नवसाक्षर होण्याचे आवाहन केले. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनीही परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या.
परीक्षेच्या नियोजनासाठी राज्यस्तरावरील शिक्षण सहसंचालक आणि उपसंचालक यांची जिल्हा परीक्षा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी विविध जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देत व्यवस्थेचा आढावा घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रांना केंद्रीय पथकाच्या भेटी
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने परीक्षा निरीक्षक म्हणून आलेले अवर सचिव राम बिलास मीना यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यांच्यासमवेत शिक्षण संचालनालय (योजना)चे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, सहाय्यक संचालक सतीश चौधरी आणि सहाय्यक योजना अधिकारी सचिन अनंतकवळस यांनीही परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
याशिवाय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक डॉ. नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक देविदास कुलाळ, शिक्षण संचालनालय चे उपसंचालक डॉ. गणपत मोरे आणि डॉ. वंदना वाहूळ, तसेच उपशिक्षणाधिकारी देवशाला शिंदे यांच्यासह राज्यातील विविध विभागीय शिक्षण उपसंचालकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्रसारमाध्यमांचे योगदान
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यातील शिक्षक संघटना, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी नियोजनबद्ध काम केले. प्रसारमाध्यमांनीही आपल्या वृत्तपत्रांद्वारे या अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृती केली.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना आणि पत्रकारांचे शिक्षण संचालनालय चे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment