मुख्याध्यापकाला 50लाच घेतांना पकडले

घारगाव येथे मुख्याध्यापक लाच घेताना रंगेहात; संस्था अध्यक्ष फरार
राहुरी।प्रतिनिधी 
 वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभाचा ठराव मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घारगावचे मुख्याध्यापक संजय दगडू राणे (वय ५५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने रंगेहात पकडले. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी, श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ, आणेचे अध्यक्ष प्रकाश चांदमलजी बोरा यांचा शोध  पोलीस करीत  आहे.
 तक्रारदार या शिक्षिका आहेत. त्यांची शिक्षिका म्हणून १५ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. १२ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या वरीष्ठ वेतन श्रेणीसाठी त्यांनी २०२४-२५ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र जमा केले होते. मात्र तरीही त्यांना वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाला नव्हता.

त्यामुळे त्यांनी जून २०२६ मध्ये मुख्याध्यापक राणे यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जावर ठराव मंजूर करून देण्यासाठी संस्था अध्यक्ष बोरा यांनी ५० हजार रुपये मागितल्याचे मुख्याध्यापकांनी तक्रारदार यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी आणे येथे जाऊन अध्यक्ष बोरा यांची भेट घेतली असता, बोरा यांनीही ठराव पाठवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम मुख्याध्यापकांकडे जमा करण्यास सांगितले.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार केली. २ नोव्हेंबर २०२६ रोजी तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक राणे यांनी पंच साक्षीदारांसमोर ५० हजार रुपये लाच मागितल्याचे मान्य केले आणि ती स्वीकारण्यास संमती दिली.

त्यानंतर आज, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी भारत हायस्कूल, घारगाव येथे सापळा रचण्यात आला. मुख्याध्यापक राणे यांनी तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

यावेळी मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरून संस्था अध्यक्ष बोरा यांच्याशी संपर्क साधून पंचांसमोर पडताळणी केली असता, बोरा यांनी लाचेचे पैसे राणे यांनाच ठेवून घेण्यास सांगितल्याचे समोर आले.

याप्रकरणी घारगाव पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्याध्यापक राणे यांना ताब्यात घेण्यात आले असून अध्यक्ष बोरा यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोहवा संजय ठाकरे, पोअं योगेश शिंदे, पोअं चेतन शेवाळे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी हे करीत आहेत.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस उपअधीक्षक प्रदिप मैराळे, अपर पोलीस उपअधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.

लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान शिक्षण संस्था व दलालांची त्रेधातिरपीट उडाली आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार